Wednesday 6 April 2022

सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा… उमाकांत मिटकर

 

उस्मानाबाद:-विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजातील उपेक्षित -वंचित घटकात जाऊन सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते उमाकांत मिटकर यांनी केले.

डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय व वात्सल्य सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि.6)रोजी डॉ.बापूजी साळुंखे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना श्री.मिटकर बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही.जी.शिंदे हे होते. यावेळी प्रा.डाॅ. स्मिता कोल्हे, प्रा. शहा, प्रा.चंदनी घोगरे, प्रा.  श्रीयश महिंद्रकर, प्रा. अजित शिंदे, प्रा. श्री.बारकुल, प्रा. श्री.मडके, प्रा. नितीन कुंभार, प्रा. संजय आंबेकर,डाॅ.गोलवाल,शिवछत्रपती पुरस्कार विजेते शाहूराज  खोगरे श्री.बागल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

मिटकर म्हणाले की, सामाजिक क्षेत्रात असंख्य अडचणी,प्रश्न आहेत, शासकीय स्तरावर त्या सोडवण्यासाठी मर्यादा येतात. अशावेळी लॅा चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करत रहावे. श्री.मिटकर यांनी त्यांच्या सामाजिक कामात आलेले अनेक अनुभव निवेदन करून विद्यार्थ्यांना प्रश्नांची जाण निर्माण करून दिली.

यावेळी डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय व वात्सल्य सामाजिक संस्थेमध्ये पुढील पाच वर्षासाठी सामाजिक विषयावर काम करण्यासाठी सामंजस्य करार झाला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने उपस्थीती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नितीन कुंभार तर आभार प्रदर्शन प्रा.संजय आंबेकर यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Friday 3 December 2021

उस्मानाबाद - सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात भाजपचे चक्काजाम आंदोलन पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर दिशा ठरवू - आ. राणाजगजितसिंह पाटील






 




उस्मानाबाद -

कृषी पंपाची वीज पुरवठा खंडित करू नये, खंडित केलेल्या शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्ववत करावी या मागणीसाठी  आज उस्मानाबाद शहरातील अधीक्षक अभियंता, महावितरण यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

खरीपातील नुकसानीपोटी महाविकास आघाडी सरकार कडून दिलेल्या शब्द न गेला नाही. एकही शेतकऱ्याला हे. १० हजार अनुदान मिळाले नाही. जे तुटपुंजे अनुदान दिले तेही पूर्ण वितरीत करण्यात आलेले नाही. अशामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वेठीस पकडून ऐन रब्बी हंगामात वीज तोडणी करत महावितरणच्या माध्यमातून राज्य सरकारने अन्यायकारक वसुली मोहीम सुरु केली आहे हे थांबवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दि.१७ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर दोन मंत्रीमंडळाच्या बैठका होवून देखील या गंभीर विषयाबाबत कुठलेच सकारत्मक पाउल उचलण्यात आले नाही. याविरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. राणाजगतजिसिंह पाटील, नेताजी पाटील, दत्ता कुलकर्णी, प्रदीप शिंदे, रमेश रणदिवे,अमर बाकले, प्रशांत रणदिवे,राजसिंहा राजेनिंबाळकर, रामदास काळगे, इंद्रजीत देवकते, ओम नाईकवाडी,सतीश दंडनाईक, विजय शिंगाडे, आनंद कंदले, राहुल काकडे, अर्चना अंबुरे, पूजा देडे आदी उपस्थित होते.

Wednesday 6 May 2020

१७ मेपर्यंत बस सेवा राहणार बंद



उस्मानाबाद,
लॉकडाऊन क्रमांक 3 अंतिम दिवसापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील बस सेवा बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांनी दिले आहेत.
 म्हणजेच जिल्ह्यात 17 मे पर्यंत बस सेवा सुरू होणार नाही. उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेजारी असलेले सोलापूर, लातूर, नगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाने ग्रासलेले रुग्ण आढळले आहेत. बस सेवा सुरू केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व बसस्थानकावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कोरोणा संसर्ग अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हाधिकारी मुधोळ - मुंडे यांनी बस सेवा बंद ठेवण्याचा आदेश निर्गमित केला आहे.

Monday 4 May 2020

माय-लेकी करताहेत "कोरोना"शी दोन हात

 
 
 उस्मानाबाद, 
कोरोनाच्या विरोधामध्ये लढाई आता तीव्र झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील एका तलाठी आईने आपल्या तेरा महिन्याच्या छकुलीला सोबत घेऊन  ग्रामपंचायतच्या कोरोना सहाय्यता कक्षातून नागरिकांना घरीच राहा, सुरक्षित राहा असा संदेश देत आहेत. तर याच छकुलीचे वडील सातत्याने 15 तास चेक पोस्टवर डोळ्यात तेल घालून कोरोना बाधित आपल्या सीमा मध्ये येणार नाही याची दक्षता घेत आहेत.

उस्मानाबाद तालुक्यातील भिकार सारोळा येथे काम करणार्‍या तलाठी वर्षा ढेकरे यांना केवळ तेरा महिन्याची  मुलगी आहे. सध्या लहान मुले व वृद्ध नागरिकांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी तज्ञाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीतही ढेकरे या आपल्या तेरा महिन्याच्या छकुलीला सोबत घेउन कर्तव्य बजावत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कोणाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असतानाही पहिल्यापासूनच संभाळण्यासाठी दुसरे कोणीही  नसल्यामुळे आपल्या लहान मुलीला सोबत घेऊन कोरोना सहाय्यता कक्षेत कर्तव्य बजावत आहेत. वास्तविक पाहतां निवासाला असलेल्या आपल्या गावापासून जवळपास पंधराकिलोमीटर दूर असलेल्या गावात जाऊन कर्तव्य बजावण्याचे काम त्यांना करावे लागत आहे. सकाळी आपले सर्व नित्यकर्म आटपून गडबडीतच त्यांना गाव गाठावी लागते. भिकार सारोळा या गावात ही अन्य गावाप्रमाणे मोठ्या प्रमाणात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या आहे. यामुळे  धोक्याची पातळी अन्य कर्मचाऱ्यांनी इतकीच आहे. वास्तविक पाहता आतापर्यंत शासनाने लहान मुले व वृद्धांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे सांगितले आहे. मात्र स्वतःच्या नोकरी पोटी तलाठी यांना आपल्या लहानग्या 13 महिन्याच्या मुलीला झोळीत ठेवून काम करावे लागते. यासाठी त्यांनी नोंदणी केंद्रातच झोळी बांधली आहे. अधून मधून रडणाऱ्या लहानगीला जवळ घेऊन नोकरीचे कर्तव्य पार पाडावे लागते. त्यांचे पतीही तलाठी म्हणून कार्यरत आहेत, त्यांना उस्मानाबाद लातूर रस्त्यावरअसलेल्या चेक पोस्टवर ड्युटी देण्यात आली आहे, असे असतानाही त्यांनाही रात्रंदिवस याच पोस्टवर काम करावे लागते. त्यामुळे त्यांनाही या आपल्या मुलीकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यांची ही कसरत पाहून सद्यस्थितीत पाहणार्‍याचे मन अधिकच हेलावत आहे.


अनेकांनी केलेली विचारपूस
अनेक महिला नेत्या व महिला अधिकाऱ्यांनी तलाठी ढेकरे यांची विचारपूस केली आहे. त्या सर्व जण मुलीची दक्षता घेण्यासाठी सल्ला देत आहेत. आतापर्यंत त्यांना खा. सुप्रिया सुळे, रुपाली चाकणकर व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी संपर्क साधून विचारपूस केली आहे. त्यामुळे वेगळे बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Sunday 3 May 2020

दिवसभर स्वॅब घेण्याचे काम...घरी गेल्यावर धाकधूक

 उस्मानाबाद, 
सध्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अनेक डॉक्टरांना अक्षरशः तळहातावर शिर घेऊन काम करावे लागत आहे. डॉ तानाजी लाकाळ यांनाही अशाच परिस्थितीला तोंड द्यावे लागत असून दिवसभर स्वॉब घेण्याचे व तपासणीचे काम केल्यानंतर रात्र धोक्याची धाकधूक मनात घेऊनच घालवावी लागत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची कमी-अधिक प्रमाणात संख्या वाढत आहे. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. सद्यस्थितीत सर्व बाजार व अन्य गर्दीच्या ठिकाणी प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु, रुग्णालय सुरूच आहेत. सध्या स्थितीत केवळ रुग्णालयात गर्दीची ठिकाणी बनले आहेत. यामुळे येथील सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. अशाच धोक्याच्या वातावरणामध्ये अनेक वैद्यकीय अधिकारी काम करत आहेत.
जिल्हा रुग्णालयात काम करणारे डॉ. तानाजी लाकाळ यांनाही अशाच पद्धतीचा परिस्थितीला त्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. डॉ. लाकाळ येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये टेस्टिंगसाठी नमुने घेण्याचे काम करत आहेत. हे करताना असताना अनेक काही बाधित रुग्णांशी संपर्क येऊ शकतो. यामुळे त्यांच्या मनामध्ये सातत्याने अस्वस्थता असते तसेच घरी गेल्यानंतर ही त्यांच्या मनामध्ये धोक्याची सातत्याने धाकधूक असते. आपल्यामुळे घरातील अन्य सदस्यांना धोका होऊ नये, म्हणून सर्व कपडे धुन्यास टाकून  ते घरात प्रवेश करतात. दिवसभर त्या कपड्यांना कोणी हात लावत नाही किंवा त्यांच्या जवळही जात नाही. तरीही अशी दक्षता घेऊनही मनामध्ये कोरोणाची भीती कायम असते. घरात गेल्यानंतर भोजना पासून सर्व कामे करत असताना मनामध्ये धोक्याची जाणीव कायम असते. सातत्याने धोक्याच्या वातावरणामध्ये स्वतःचे जीवन व्यतीत करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 
-
स्वतःच्या लहानग्या मुलाला दूर ठेवून
डॉ. लाकाळ हे जिल्हा रुग्णालयात काम करत आहेत. त्यांच्या पत्नी खासगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत.  ते दोघेही सातत्याने रुग्णांच्या संपर्कात येत असतात. यामुळे आपल्या स्वतःच्या लहान मुलांना दूर आपल्या मूळगावी ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांचा लहान मुलगा सातत्याने त्यांची आठवण काढतो. परंतु, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून समजूत घालून त्याला शांत करावे लागते.

-
सध्या डॉक्टरांना पीपीई किट परिधान करावे लागत आहेत. त्यातच सध्या तापमानही वाढलेले आहे. पारा 40 अंशाच्या पलीकडे गेला आहे. अशा परिस्थितीत किट परिधान केल्यानंतर उकाडा अधिक जाणवतो. त्यातल्या त्यात एसी व कुलर लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत उष्णतेच्या दाहक वातावरणामध्ये किट अंगावर ठेवूनच त्यांना काम करावे लागते.

Monday 8 April 2019

पळसप ग्रामपंचायतीची ′अशीही बनवाबनवी′


नवीन टँकरसाठी दाखविली जुनीच अधिग्रहित कूपनलिका
पळसप ता.5(बातमीदार):-गावात नवीन टँकर मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतने चक्क यापूर्वी अधिग्रहित केलेली कूपनलिका दाखवल्यामुळे स्थळपाहणीसाठी आलेलया उस्मानाबाद पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी स्रोत नाकारला आहे. ग्रामपंचायतीच्या अशा बनवेगिरीमुळे टंचाईत होपळणाऱ्या ग्रामस्थांची टँकरची प्रतीक्षा वाढली आहे.
       गावची लोकसंख्या जवळपास आठ हजार असून गावासाठी भारत निर्माण योजना एक कोटी रुपये खर्च करुन राबविण्यात आली आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिमुळे पाणीपुरवठा करणाऱ्या विंधन विहीर व कूपन‍लिका आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना सध्या विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. यासाठी त्यांना एक हजार लिटरसाठी दोनशे रुपये, 750 लिटरसाठी 125 रुपये, तर घागरभर आरओच्या शुध्द पाण्यासाठी 10 रुपये, वापरण्याच्या पाण्यासाठी आडीच रुपये मोजावे लागत आहेत.
गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी  सध्या एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. मात्र, या टँकरची क्षमता 24 हजार लिटर असल्याने कूपन‍लिकांवर ते भरण्यासाठी तीन ते साडेतीन तास व फेरी करुन परत येण्यासाठी एक ते दीड तास वेळ लागत आहे.  वीजपुरवठा आठ तासच चालत असल्याने या टँकरला दोन फेऱ्या करणेही कठीण होत आहे. परिणामी या ठिकाणी 18 ते 20 दिवसाला नळाला पाणी पुरवठा होत आहे. आणखी दोन टँकर सुरु करण्याची मागणी नागरिकातून होऊ लागल्यावर ग्रामपंचायतने  टँकर मागणीचा प्रस्ताव पाठवून दिला. मात्र, प्रस्तावासोबत ज्या शेतकऱ्यांची कूपनलिका अगोदरच अधिग्रहित केली तीच पुन्हा टँकरसाठी दाखवल्याचे  उघडे पडले. पाहणी करण्यास आलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनाही याचा अचंबा वाटला. यामुळे दाखवलेली कूपनलिका त्यांनी नामंजूर केली.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या अशा खोटारडेपणाची गावात चांगलीच चर्चा आहे. पदाधिकाऱ्याच्या अशा खोटारडेपणामुळे ग्रामस्थांना आणखी काही दिवस टँकरपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
सध्या नवीन टँकर मागणीचा प्रस्ताव दिला असून पाणी स्त्रोत मिळत नसल्यामुळे टँकर मंजूरीस विलंब लागत आहे, लवकरच नवीन पाणी स्त्रोत उपलब्ध करुन देण्यासाठी स्त्रोत पाहण्यात येत आहे.
                                                     -दिलीप म्हेत्रे, सरपंच, पळसप


Tuesday 29 January 2019

ग्रामसभेत पडला तक्रारींचा पाऊस


पळसपच्या ग्रामसभेत सरपंचांना धरले धारेवर
पळसप,ता.28(बातमीदार):- टंचाई परिस्थितीमुळे अधिग्रहन केले असतानाही महिन्यातून एकदाही नळाला पाणी का सोडले जात नाही, अधिग्रहित कुपनलिकेचे पाणी विक्री केले जात असताना पायबंद का घातला जात नाही, आदी प्रश्नाचा भडीमार करत ग्रामस्थांनी ग्रामसभेत अक्षरशा: तक्रारीचा पाऊस पाडला. ग्रामस्थांनी सरपंचांना चांगलेच धारेवर धरले.
          पळसप (ता.उस्मानाबाद) येथे रविवारी (ता.26) सरपंच दिलीप म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी उपसरपंच दिपक सरडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद लाकाळ, नेताजी फुटाणे, विलास सुरवसे, फुलचंद फुटाणे, कल्याण लाकाळ, ग्रामविकास अधिकारी श्री.करपे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी ग्रामविकास अधिकारी श्री. करपे यांनी ग्रामसभेतील विषयाचे वाचन करुन ग्रामसभेला सुरुवात केली. तेव्हा मागिल ग्रामसभेचे इतिवृत्त न वाचता ग्रामसभा सुरु केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
          गावात सध्या तीव्र पाणी टंचाईमुळे चार कुपनलिकांचे अधिग्रहन करण्यात आले असतानाही महिण्यातून नळाला केवळ एक वेळेस पाणी येते. त्यामुळे ग्रामस्थांना विकत घेतलेल्या पाण्यावर सध्या आपली तहान भागवण्याची वेळ आली आहे, अशी बाजू मांडत ग्रामस्थांनी अधिग्रहित कूपनलिकेचे पाणी विक्री करत असलयाची तक्रार केली. असे असतानाही ग्रामपंचायत या बाबीकडे दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्न विचारुन सरपंच म्हेत्रे यांना धारेवर धरले. अधिग्रहित कूपनलिकेपैकी एक कूपनलिका सरपंच म्हेत्रे यांच्या मालकीची  आहे. मात्र, ही  महिन्यापूर्वी बंद पडली असतानाही ग्रामपंचायतने वरिष्ठ कार्यालयाला वेळेत माहिती का दिली नाही, असे म्हणत ग्रामस्थांनी जाब विचारला.  स्वच्छताग्रहाचे बांधकाम करुन देखील अनुदान न मिळणे, आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसणे, शाळेला पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होणे आदी प्रश्नविचारुन ग्रामस्थांनी अक्षरशा: तक्रारींचा पाऊसच पाडला. कृषी सहाय्यक गावात फिरकत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक गैरसोईचा सामना करावा लागत असल्याने कृषी सहाय्यकाची बदली करण्याचा ठराव यावेळी ग्रामसभेत घेण्यात आला.
*****




सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा… उमाकांत मिटकर

  उस्मानाबाद:-विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजातील उपेक्षित -वंचित घटकात जाऊन सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा,असे आवाहन सामाजिक का...