Monday, 8 April 2019

पळसप ग्रामपंचायतीची ′अशीही बनवाबनवी′


नवीन टँकरसाठी दाखविली जुनीच अधिग्रहित कूपनलिका
पळसप ता.5(बातमीदार):-गावात नवीन टँकर मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतने चक्क यापूर्वी अधिग्रहित केलेली कूपनलिका दाखवल्यामुळे स्थळपाहणीसाठी आलेलया उस्मानाबाद पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी स्रोत नाकारला आहे. ग्रामपंचायतीच्या अशा बनवेगिरीमुळे टंचाईत होपळणाऱ्या ग्रामस्थांची टँकरची प्रतीक्षा वाढली आहे.
       गावची लोकसंख्या जवळपास आठ हजार असून गावासाठी भारत निर्माण योजना एक कोटी रुपये खर्च करुन राबविण्यात आली आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिमुळे पाणीपुरवठा करणाऱ्या विंधन विहीर व कूपन‍लिका आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना सध्या विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. यासाठी त्यांना एक हजार लिटरसाठी दोनशे रुपये, 750 लिटरसाठी 125 रुपये, तर घागरभर आरओच्या शुध्द पाण्यासाठी 10 रुपये, वापरण्याच्या पाण्यासाठी आडीच रुपये मोजावे लागत आहेत.
गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी  सध्या एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. मात्र, या टँकरची क्षमता 24 हजार लिटर असल्याने कूपन‍लिकांवर ते भरण्यासाठी तीन ते साडेतीन तास व फेरी करुन परत येण्यासाठी एक ते दीड तास वेळ लागत आहे.  वीजपुरवठा आठ तासच चालत असल्याने या टँकरला दोन फेऱ्या करणेही कठीण होत आहे. परिणामी या ठिकाणी 18 ते 20 दिवसाला नळाला पाणी पुरवठा होत आहे. आणखी दोन टँकर सुरु करण्याची मागणी नागरिकातून होऊ लागल्यावर ग्रामपंचायतने  टँकर मागणीचा प्रस्ताव पाठवून दिला. मात्र, प्रस्तावासोबत ज्या शेतकऱ्यांची कूपनलिका अगोदरच अधिग्रहित केली तीच पुन्हा टँकरसाठी दाखवल्याचे  उघडे पडले. पाहणी करण्यास आलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनाही याचा अचंबा वाटला. यामुळे दाखवलेली कूपनलिका त्यांनी नामंजूर केली.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या अशा खोटारडेपणाची गावात चांगलीच चर्चा आहे. पदाधिकाऱ्याच्या अशा खोटारडेपणामुळे ग्रामस्थांना आणखी काही दिवस टँकरपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
सध्या नवीन टँकर मागणीचा प्रस्ताव दिला असून पाणी स्त्रोत मिळत नसल्यामुळे टँकर मंजूरीस विलंब लागत आहे, लवकरच नवीन पाणी स्त्रोत उपलब्ध करुन देण्यासाठी स्त्रोत पाहण्यात येत आहे.
                                                     -दिलीप म्हेत्रे, सरपंच, पळसप


Tuesday, 29 January 2019

ग्रामसभेत पडला तक्रारींचा पाऊस


पळसपच्या ग्रामसभेत सरपंचांना धरले धारेवर
पळसप,ता.28(बातमीदार):- टंचाई परिस्थितीमुळे अधिग्रहन केले असतानाही महिन्यातून एकदाही नळाला पाणी का सोडले जात नाही, अधिग्रहित कुपनलिकेचे पाणी विक्री केले जात असताना पायबंद का घातला जात नाही, आदी प्रश्नाचा भडीमार करत ग्रामस्थांनी ग्रामसभेत अक्षरशा: तक्रारीचा पाऊस पाडला. ग्रामस्थांनी सरपंचांना चांगलेच धारेवर धरले.
          पळसप (ता.उस्मानाबाद) येथे रविवारी (ता.26) सरपंच दिलीप म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी उपसरपंच दिपक सरडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद लाकाळ, नेताजी फुटाणे, विलास सुरवसे, फुलचंद फुटाणे, कल्याण लाकाळ, ग्रामविकास अधिकारी श्री.करपे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी ग्रामविकास अधिकारी श्री. करपे यांनी ग्रामसभेतील विषयाचे वाचन करुन ग्रामसभेला सुरुवात केली. तेव्हा मागिल ग्रामसभेचे इतिवृत्त न वाचता ग्रामसभा सुरु केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
          गावात सध्या तीव्र पाणी टंचाईमुळे चार कुपनलिकांचे अधिग्रहन करण्यात आले असतानाही महिण्यातून नळाला केवळ एक वेळेस पाणी येते. त्यामुळे ग्रामस्थांना विकत घेतलेल्या पाण्यावर सध्या आपली तहान भागवण्याची वेळ आली आहे, अशी बाजू मांडत ग्रामस्थांनी अधिग्रहित कूपनलिकेचे पाणी विक्री करत असलयाची तक्रार केली. असे असतानाही ग्रामपंचायत या बाबीकडे दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्न विचारुन सरपंच म्हेत्रे यांना धारेवर धरले. अधिग्रहित कूपनलिकेपैकी एक कूपनलिका सरपंच म्हेत्रे यांच्या मालकीची  आहे. मात्र, ही  महिन्यापूर्वी बंद पडली असतानाही ग्रामपंचायतने वरिष्ठ कार्यालयाला वेळेत माहिती का दिली नाही, असे म्हणत ग्रामस्थांनी जाब विचारला.  स्वच्छताग्रहाचे बांधकाम करुन देखील अनुदान न मिळणे, आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसणे, शाळेला पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होणे आदी प्रश्नविचारुन ग्रामस्थांनी अक्षरशा: तक्रारींचा पाऊसच पाडला. कृषी सहाय्यक गावात फिरकत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक गैरसोईचा सामना करावा लागत असल्याने कृषी सहाय्यकाची बदली करण्याचा ठराव यावेळी ग्रामसभेत घेण्यात आला.
*****




Saturday, 15 December 2018

यंदा टोचणार “रेशीम” चे काटे




रेशीम उत्पादक अडचणीत, टँकरने पाणी विकत घेऊन तूती जगविण्याची कसरत 


पळसप,दि.14(बातमीदार):- जिल्ह्यात शेतकऱ्यांना सध्या भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सर्वत्र पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पळसप (ता.उस्मानाबाद) येथील रेशीम उत्पादक शेतकरी लागवडीवर मोठा खर्च करुन देखील अडचणीत आले आहेत. त्यांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे.  तुतीला जगविण्यासाठी चक्क टँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे. राजेंद्र माळी यांनी आतापर्यंत टँकरने पाणी देऊन तुती जगवण्याचा प्रयत्न केला आहे.
पळसप येथे ऊसाबरोबरच रेशीम उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने येथील जवळपास 18 शेतकऱ्यांनी 20 एकरवर रेशीम शेती उभी केली आहे. पारंपारिक शेतीला टाळून येथील काही शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. मात्र, या शेतकऱ्यांना आता दुष्काळी परिस्थितीचा फटका सहन करावा लागत आहे. यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने विहीरीने तळ गाठला आहे.  कूपनलिकाही  बंद पडल्या आहेत, त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा तुती जगवण्यासाठी पाणीच नसल्याने रेशीम उत्पादक शेतकरी  पार मेटाकुटीला आले आहेत.
 रेशीम शेती जगविण्यासाठी श्री. माळी यांनी जिद्दीने प्रयत्न करुन टँकरच्या सहाय्याने पाणी घालून रेशिम शेती हिरवी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यांना सातत्याने 700 रुपये देउन पाच हजार लिटरचे टँकर घ्यावे लागत आहे. असा खर्च करुनही त्यांना फायदा होण्याची शक्यता कमीच वाटत आहे. कारण सध्या रेशिम कोषाला भाव कमी मिळत असल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.
सध्या रेशीम कोषाला प्रतिकिलोला शंभर ते 250 रुपये प्रमाणे भाव मिळत आहे. याची कर्नाटकमध्ये नेउन विक्री करावा लागत आहे. त्यामुळे रेशीम कोष व्रिकीसाठी किलोमागे जवळपास 30 ते 40 रुपये शेतकऱ्यांना वाहतूक खर्च येत आहे. कर्नाटक राज्यात रेशीम कोषाला किलोमागे 50 रुपये प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. मात्र, किलोमागे 30 ते 40 रुपये वाहतूक खर्च येथील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असून कर्नाटकप्रमाणे राज्यात शासनाने किलोला किमान 100 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
गेल्या वर्षी रेशीम कोषाचा दर 475 ते 650 पर्यंत होता. मात्र, यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना देखील दर घसरले असल्याने शेतकरी मोठया अडचणीत आले आहेत. त्यातच दुष्काळामुळे पाण्याची समस्या निर्माण झाल्याने टँकरने पाणी द़यावे लागत असल्यामुळे अडचणीत अणखीनच भर पडली आहे. जमेल तेथून टँकरने विकत पाणी आणून झाडे जगविण्याचा आटापिटा करावा लागत आहे.

Tuesday, 30 October 2018

किटकनाशके, तणनाशके फवारताना काळजी घ्यावी


शेतात उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी विविध किटकनाशके, तणनाशके फवारत असतात ती फवारत असताना  शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. रासायनिक औषधे शेतकरी शेतात, झाडांवर फवारताना मुख्यत: तीन प्रकारे धेका निर्माण होवू शकतो. रासायनिक औषधांचे अत्यंत बारीक कण हवेबरोबर श्वासोच्छवासासोबत शरीरात जातात. फवारणी करीत असताना त्वचेच्या संपर्कामधून तथा डोळयांद्वारे शरीरात जातात. फवारणी करतांना नकळत तोंडाद्वारे खताना, बीडी पीताना शरीरात जाऊ शकतात.
किटकनाशके वापर करताना सर्वसाधारपणे घ्यावयाची काळजी :
 किटनाशकाच्या प्रत्येक वेष्टनासमवेत त्या किटकनाशकाचे लेबल व माहितीपत्रक अंतर्भूत असते, या लेबल व माहितीपत्रकामध्ये असेलेली माहिती नीट वाचावी व समजून घ्यावी. किटकनाशके मुळ पॅकिंगमध्ये खरेदी करावीत. किटनाशके ही विषारी असल्याने त्यांची हाताळणी करतांना सदैव जागरुक रहावे. किटकनाशके वापरण्याची साधनसामग्री जसे फवारणी पंप नेहमी व्यवस्थित चालू ठेवावेत. गळके फवारणी यंत्र न वापरता ते दुरुस्त करुन वापरावे. किटकनाशके फवारणी यंत्रात भरतांना सांडू नये यासाठी नरसाळ्याचा वापर करावा. तणनाशक फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप किटकनाशक फवारणीसाठी वापरु नये. किटकनाशक वापरताना संरक्षक कपडे घालावे.(उदा. गॉगल, पायात मोजे, तोंडाला मास्क, डोक्यावर कापड, गमबुट इ.)
फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवून ठेवावेत. झिजलेली, खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत. किटकनाशकाला हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे. फवारणीचे मिश्रण जेवढे लागणार आहे तेवढे एकदाच तयार करुन हाताने न ढवळता लांब लाकडी दांड्याचा किंवा काठीचा वापर करावा. किटकनाशक पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रण करतांना अथवा फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे. पाऊस येण्यापूर्वी किंवा पाऊस झाल्यानंतर तसेच तीव्र ऊन्हात फवारणी करु नये. फवारणीचे काम पूर्ण झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवून खाणे-पिणे करावे. फवारणीचे वेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासून दूर ठेवावे. उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपूर्वी न्याहारी करावी. फवारणी करताना वापरलेली भांडी, साहित्य नदी, नाला किंवा विहिरीजवळ धुवू नयेत.
धुतांना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीत टाकावेत अथवा मातीत गाडावे. किटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर नष्ट करुन टाकाव्यात. फवारणी करताना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुंकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढू नये त्यासाठी सोयीस्कर तार, काडी किंवा टाचणी वापरावी. किटकनाशके फवारण्याचे काम करताना वापरण्याचे कपडे स्वतंत्र ठेवावेत व वेळोवेळी स्वच्छ धुवून काढावेत. किटकनाशके अंगावर पडू नयेत म्हणून वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करुन तसेच उंच झाडावर फवारणी करताना औषध अंगावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. किटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरण्यासाठी किमान दोन आठवडे जावू देवू नये. जमिनीवर सांडलेले किटकनाशक हातांनी न पुसता त्यावर पाणी न टाकता ती माती/ चिखल यांच्या सहाय्याने शोषून घ्यावेत व जमिनीत गाडून टाकावीत. डब्यांवरील मार्गदर्शक चिन्हाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. त्यानुसार सुरुवातीस हिरवा रंग कमी विषारी, निळा रंग मध्यम विषारी त्यानंतर पिवळा रंग तीव्र विषारी व शेवटी लाल अती तीव्र विषारी चिन्ह, खून असलेली औषधे क्रमाने वापरावे.
विषबाधाची लक्षणे :- अशक्तपणा व चक्कर येणे, त्वचेची जळजळ होणे, डाग पडणे, घाम येणे, डोळ्यांची जळजळ होणे, पाणी येणे, अंधुक दिसणे, तोंडातून लाळ गाळणे, तोंडाची आग होणे, उलटी येणे, मळमळणे, हगवण होणे, पोटात दुखणे, डोकेदुखी, अस्वस्थ होणे, स्नायुदुखी, जीभ लुळी पडणे, बेशुद्ध होणे, धाप लागणे, छातीत दुखणे, खोकला येणे.
विषबाधेची शंका आल्यास खात्री करा:- रोग्याचा किटकनाशकांसह संपर्क आला होता काय? नेमके कोणते किटकनाशके वापरले? आंतरप्रवाही की स्पर्शजन्य? डॉक्टरांसाठी ही  माहिती  महत्त्वाची आहे. रोग्यास शक्य तितक्या लवकर  दवाखान्यात पोहचवा.
तरी शेतकऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
                                                          विलास फुटाणे उस्मानाबाद.



Monday, 24 September 2018

वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य सेवेचा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय - पालकमंत्री अर्जुन खोतकर




                                               
उस्मानाबाद,दि.18:वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त अन्य खर्च न करता आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य सेवा करण्याचा उपक्रम कौतुकास्पदच नव्हे तर अनुकरणीय सुध्दा आहे, असे उपक्रम सर्वांनीच राबवण्याची गरज आहेअसे मत पशुसंवर्धनदुग्धव्यवसाय विकासमत्स्यव्यवसायआणि वस्त्रद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री श्री.अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले.
उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथे स्व.ज्ञानोबा सोपान लाकाळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ छत्रपती बहुद्देशिय सामाजिक संस्था,पळसप व लाईफलाईन हॉस्पीटल उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील, उस्मानाबाद नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय देवळकर, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे,  युवासेनेचे कार्यकर्ते अजित लाकाळ, शिवसेना तालुकाध्यक्ष (उमरगा) बाबूराव शहापूरे, युवासेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नितिन लांडगे, दिलीप जावळे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना पालकमंत्री श्री. खोतकर म्हणाले कीआज स्मृतिदिन व अन्य कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येतात मात्र प्रत्यक्षात याचा उपयोग होताना दिसत नाही डॉक्टर तानाजी लाकाळ यांनी वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. यामुळे अनेक गरजूंना आरोग्य विषयक लाभ झाला आहे. असे उपक्रम राबवून प्रत्येकांनी समाजाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. शासनाच्या वतीने अनेक आरोग्य योजना राबवण्यात येत आहेत. यामुळे आरोग्य संवर्धन होण्यासाठी मदत होत आहे. 
यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील बोलताना म्हणाल्या की, वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आरोग्य शिबिराचे आयोजन करुन माणसामध्ये देव शोधण्याचा प्रयत्न आपण केला आहे.
या शिबिरात डॉ.नवीन तोतला, डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. रणजीत कदम, डॉ.नितीन भोसले, डॉ. प्रेमसागर जाधव, डॉ. कुलदिप सस्ते, डॉ. गणेश पोलावार, डॉ. रविंद्र पापडे, डॉ. दिग्गज दापके, डॉ. अविनाश बदणे, डॉ. वसुधा दापके देशमुख, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. रेखा टिके, डॉ. स्वाती लाकाळ, डॉ. बालाजी लोमटे आदी तज्ञ डॉक्टरमार्फत  1638 रुग्णांची तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आले. यावेळी मधुमेह रुग्णाची तपासणी सल्ला व उपचार, लहान मुलांची तपासणी, स्त्री रुग्णाची तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांची मोफत ईसीजी, मोफत (कावीळ) हिपाटासटीस बी तपासणीही करण्यात आली.
त्याचबरोबर यावेळी रक्तदान शिबिरात 20 रक्तदात्यानी रक्तदान केले. त्रस्त शेतकरी कुटुंबातील दोन पाल्यांचे इयत्ता 10 वी पर्यंतचे शैक्षणिक दत्तकत्वही संस्थेच्या वतीने स्विकारण्यात आले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या वर्षीच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी पाच हजाराचा धनादेश देण्यात आला. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ तानाजी लाकाळसूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले तर  आभार लक्ष्मीकांत लाकाळ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास फुटाणे, महादेव लाकाळ, धनंजय लाकाळ, संतोष लाकाळ, प्रमोद लाकाळ, रमेश लाकाळ,  संतोष निकम, प्रदिप लाकाळ यांनी पुढाकार घेतला.

 
 

Saturday, 15 September 2018

पळसप येथे सर्वरोग निदान आरोग्य शिबिराचे सोमवारी आयोजन


उस्मानाबाद,दि. 14: - उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथे स्व.ज्ञानोबा सोपान लाकाळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ छत्रपती बहुद्देशिय सामाजिक संस्था,पळसप व लाईफ लाईन हॉस्पीटल उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन सोमवार दि. 17 सप्टेंबर 2018 रोजी करण्यात आले असून या शिबिराचे उद्‌घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय, आणि वस्त्रद्योग राज्यमंत्री मा.श्री. अर्जून खोतकर यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.
        या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, दिलीप नाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. आमदार विक्रम काळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर कर्तृत्ववान व्यक्तीचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान सोहळा होणार आहे. या शिबिरास मधुमेह रुग्णाची तपासणी सल्ला व उपचार, रक्तदाब रुग्णाची मोफत तपासणी व उपचार, गरजू रुग्णांची मोफत ईसीजी, लहान मुलांची बालरोग तज्ञामार्फत तपासणी, स्त्री रुग्णाची तपासणी, मोफत (कावीळ) हिपाटासटीस बी तपासणी सल्ला व उपचार आदी  ह्दयरोग, मधुमेह तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, जनरल सर्जन, पोट व आतडयाचे आजार तज्ञ, यकृत तज्ञ, किडनी व मूतखडा तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, कान,नाक, घसा तज्ञ आदी तज्ञ डॉक्टर मार्फत तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले असून त्रस्त शेतकरी कुटुंबातील दोन पाल्यांचे शैक्षणिक दत्तकत्वही संस्थेच्या वतीने स्विकारण्यात येणार आहेत. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. 

Monday, 2 April 2018

उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका,सेविका व मदतनीस यांचा गौरव


                                                                     दि. 28 मार्च 2018
उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका,सेविका व मदतनीस यांचा गौरव

उस्मानाबाद.दि.28:-  जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त  उत्कृष्ट काम करणाऱ्या आदर्श 18 अंगणवाडी पर्यवेक्षिका, 65 अंगणवाडी सेविका व 67 मदतनीस यांचा प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद महिला सदस्यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
            जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महिला व बालकल्याण सभापती सौ. सखुबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, समाजकल्याण सभापती चंद्रकला नारायणकर, महिला व बालकल्याण समिती सदस्या सक्षणा सलगर, श्रीमती.मीनाताई तोडकर, सौ. ज्योती पत्रिके, उषाताई यरकळ, श्रीमती.जयश्री खंडागळे, श्रीमती.अस्मिता कांबळे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेव राजगुरु, श्री. उध्दव साळवी, श्रीमती.छायाताई कांबळे, सामाजिक कार्यकर्ते रमेश पवार, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी आर्यचाणक्य विद्यालयाच्या विद्यार्थींनी स्वागतगीत सादर केले.
            यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील म्हणाले की, देशाचे भवितव्य अंगणवाडी केंद्रातून घडत असल्याने अंगणवाडी केंद्र अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगितले.
            अंगणवाडी सेविका यांचे स्थान बालकांच्या जीवनात आईबरोबरचे आहे, 14 व्या वित्त आयोगातून सर्व अंगणवाडी केंद्रांना टीव्ही संच घेण्याचे आवाहन करुन अंगणवाडीतील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी सांगितले.
            जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांनी अंगणवाडी सेविकांनी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले.
                        महिला बालकल्याण सभापती श्रीमती.पवार यांनी जिल्ह्यातील कुपोषण निर्मुलनासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांनी केलेल्या कामाचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.
            उप मुख्य कार्यकारी अधिकारी(बाक)श्री.बी.एच.निपाणीकर यांनी निती आयोग निर्देशांक, लोकसहभागातून सुरु करण्यात आलेले 170 ग्राम बालविकास केंद्र, सन 2018-22 चे व्हिजन डाक्युमेंट, अंगणवाडी प्रवेशोत्सव अभियान आदींबाबतची माहिती प्रास्ताविकातून विषद केली.
            जिल्ह्यातील दहा प्रकल्पांतर्गत कार्यकरत असलेल्या अंगणवाडी सेविकांपैकी ज्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी उत्कृष्ट काम केले आहे त्यांचा प्रकल्पनिहाय सत्कार करण्यात आला. आयएसओ मानाकंन प्राप्त झालेल्या अंगणवाडी केंद्रांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस मोठया प्रमाणात उपस्थित होत्या.              

पळसप येथे इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल पेडियाट्रिक्स तर्फे वृक्षारोपण

धाराशिव:- इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल पेडियाट्रिक्स यांच्या वतीने पळसप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आल...