Wednesday, 6 May 2020

१७ मेपर्यंत बस सेवा राहणार बंद



उस्मानाबाद,
लॉकडाऊन क्रमांक 3 अंतिम दिवसापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील बस सेवा बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांनी दिले आहेत.
 म्हणजेच जिल्ह्यात 17 मे पर्यंत बस सेवा सुरू होणार नाही. उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेजारी असलेले सोलापूर, लातूर, नगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाने ग्रासलेले रुग्ण आढळले आहेत. बस सेवा सुरू केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व बसस्थानकावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कोरोणा संसर्ग अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हाधिकारी मुधोळ - मुंडे यांनी बस सेवा बंद ठेवण्याचा आदेश निर्गमित केला आहे.

Monday, 4 May 2020

माय-लेकी करताहेत "कोरोना"शी दोन हात

 
 
 उस्मानाबाद, 
कोरोनाच्या विरोधामध्ये लढाई आता तीव्र झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील एका तलाठी आईने आपल्या तेरा महिन्याच्या छकुलीला सोबत घेऊन  ग्रामपंचायतच्या कोरोना सहाय्यता कक्षातून नागरिकांना घरीच राहा, सुरक्षित राहा असा संदेश देत आहेत. तर याच छकुलीचे वडील सातत्याने 15 तास चेक पोस्टवर डोळ्यात तेल घालून कोरोना बाधित आपल्या सीमा मध्ये येणार नाही याची दक्षता घेत आहेत.

उस्मानाबाद तालुक्यातील भिकार सारोळा येथे काम करणार्‍या तलाठी वर्षा ढेकरे यांना केवळ तेरा महिन्याची  मुलगी आहे. सध्या लहान मुले व वृद्ध नागरिकांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी तज्ञाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीतही ढेकरे या आपल्या तेरा महिन्याच्या छकुलीला सोबत घेउन कर्तव्य बजावत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कोणाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असतानाही पहिल्यापासूनच संभाळण्यासाठी दुसरे कोणीही  नसल्यामुळे आपल्या लहान मुलीला सोबत घेऊन कोरोना सहाय्यता कक्षेत कर्तव्य बजावत आहेत. वास्तविक पाहतां निवासाला असलेल्या आपल्या गावापासून जवळपास पंधराकिलोमीटर दूर असलेल्या गावात जाऊन कर्तव्य बजावण्याचे काम त्यांना करावे लागत आहे. सकाळी आपले सर्व नित्यकर्म आटपून गडबडीतच त्यांना गाव गाठावी लागते. भिकार सारोळा या गावात ही अन्य गावाप्रमाणे मोठ्या प्रमाणात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या आहे. यामुळे  धोक्याची पातळी अन्य कर्मचाऱ्यांनी इतकीच आहे. वास्तविक पाहता आतापर्यंत शासनाने लहान मुले व वृद्धांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे सांगितले आहे. मात्र स्वतःच्या नोकरी पोटी तलाठी यांना आपल्या लहानग्या 13 महिन्याच्या मुलीला झोळीत ठेवून काम करावे लागते. यासाठी त्यांनी नोंदणी केंद्रातच झोळी बांधली आहे. अधून मधून रडणाऱ्या लहानगीला जवळ घेऊन नोकरीचे कर्तव्य पार पाडावे लागते. त्यांचे पतीही तलाठी म्हणून कार्यरत आहेत, त्यांना उस्मानाबाद लातूर रस्त्यावरअसलेल्या चेक पोस्टवर ड्युटी देण्यात आली आहे, असे असतानाही त्यांनाही रात्रंदिवस याच पोस्टवर काम करावे लागते. त्यामुळे त्यांनाही या आपल्या मुलीकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यांची ही कसरत पाहून सद्यस्थितीत पाहणार्‍याचे मन अधिकच हेलावत आहे.


अनेकांनी केलेली विचारपूस
अनेक महिला नेत्या व महिला अधिकाऱ्यांनी तलाठी ढेकरे यांची विचारपूस केली आहे. त्या सर्व जण मुलीची दक्षता घेण्यासाठी सल्ला देत आहेत. आतापर्यंत त्यांना खा. सुप्रिया सुळे, रुपाली चाकणकर व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी संपर्क साधून विचारपूस केली आहे. त्यामुळे वेगळे बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Sunday, 3 May 2020

दिवसभर स्वॅब घेण्याचे काम...घरी गेल्यावर धाकधूक

 उस्मानाबाद, 
सध्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अनेक डॉक्टरांना अक्षरशः तळहातावर शिर घेऊन काम करावे लागत आहे. डॉ तानाजी लाकाळ यांनाही अशाच परिस्थितीला तोंड द्यावे लागत असून दिवसभर स्वॉब घेण्याचे व तपासणीचे काम केल्यानंतर रात्र धोक्याची धाकधूक मनात घेऊनच घालवावी लागत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची कमी-अधिक प्रमाणात संख्या वाढत आहे. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. सद्यस्थितीत सर्व बाजार व अन्य गर्दीच्या ठिकाणी प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु, रुग्णालय सुरूच आहेत. सध्या स्थितीत केवळ रुग्णालयात गर्दीची ठिकाणी बनले आहेत. यामुळे येथील सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. अशाच धोक्याच्या वातावरणामध्ये अनेक वैद्यकीय अधिकारी काम करत आहेत.
जिल्हा रुग्णालयात काम करणारे डॉ. तानाजी लाकाळ यांनाही अशाच पद्धतीचा परिस्थितीला त्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. डॉ. लाकाळ येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये टेस्टिंगसाठी नमुने घेण्याचे काम करत आहेत. हे करताना असताना अनेक काही बाधित रुग्णांशी संपर्क येऊ शकतो. यामुळे त्यांच्या मनामध्ये सातत्याने अस्वस्थता असते तसेच घरी गेल्यानंतर ही त्यांच्या मनामध्ये धोक्याची सातत्याने धाकधूक असते. आपल्यामुळे घरातील अन्य सदस्यांना धोका होऊ नये, म्हणून सर्व कपडे धुन्यास टाकून  ते घरात प्रवेश करतात. दिवसभर त्या कपड्यांना कोणी हात लावत नाही किंवा त्यांच्या जवळही जात नाही. तरीही अशी दक्षता घेऊनही मनामध्ये कोरोणाची भीती कायम असते. घरात गेल्यानंतर भोजना पासून सर्व कामे करत असताना मनामध्ये धोक्याची जाणीव कायम असते. सातत्याने धोक्याच्या वातावरणामध्ये स्वतःचे जीवन व्यतीत करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 
-
स्वतःच्या लहानग्या मुलाला दूर ठेवून
डॉ. लाकाळ हे जिल्हा रुग्णालयात काम करत आहेत. त्यांच्या पत्नी खासगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत.  ते दोघेही सातत्याने रुग्णांच्या संपर्कात येत असतात. यामुळे आपल्या स्वतःच्या लहान मुलांना दूर आपल्या मूळगावी ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांचा लहान मुलगा सातत्याने त्यांची आठवण काढतो. परंतु, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून समजूत घालून त्याला शांत करावे लागते.

-
सध्या डॉक्टरांना पीपीई किट परिधान करावे लागत आहेत. त्यातच सध्या तापमानही वाढलेले आहे. पारा 40 अंशाच्या पलीकडे गेला आहे. अशा परिस्थितीत किट परिधान केल्यानंतर उकाडा अधिक जाणवतो. त्यातल्या त्यात एसी व कुलर लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत उष्णतेच्या दाहक वातावरणामध्ये किट अंगावर ठेवूनच त्यांना काम करावे लागते.

Monday, 8 April 2019

पळसप ग्रामपंचायतीची ′अशीही बनवाबनवी′


नवीन टँकरसाठी दाखविली जुनीच अधिग्रहित कूपनलिका
पळसप ता.5(बातमीदार):-गावात नवीन टँकर मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतने चक्क यापूर्वी अधिग्रहित केलेली कूपनलिका दाखवल्यामुळे स्थळपाहणीसाठी आलेलया उस्मानाबाद पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी स्रोत नाकारला आहे. ग्रामपंचायतीच्या अशा बनवेगिरीमुळे टंचाईत होपळणाऱ्या ग्रामस्थांची टँकरची प्रतीक्षा वाढली आहे.
       गावची लोकसंख्या जवळपास आठ हजार असून गावासाठी भारत निर्माण योजना एक कोटी रुपये खर्च करुन राबविण्यात आली आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिमुळे पाणीपुरवठा करणाऱ्या विंधन विहीर व कूपन‍लिका आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना सध्या विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. यासाठी त्यांना एक हजार लिटरसाठी दोनशे रुपये, 750 लिटरसाठी 125 रुपये, तर घागरभर आरओच्या शुध्द पाण्यासाठी 10 रुपये, वापरण्याच्या पाण्यासाठी आडीच रुपये मोजावे लागत आहेत.
गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी  सध्या एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. मात्र, या टँकरची क्षमता 24 हजार लिटर असल्याने कूपन‍लिकांवर ते भरण्यासाठी तीन ते साडेतीन तास व फेरी करुन परत येण्यासाठी एक ते दीड तास वेळ लागत आहे.  वीजपुरवठा आठ तासच चालत असल्याने या टँकरला दोन फेऱ्या करणेही कठीण होत आहे. परिणामी या ठिकाणी 18 ते 20 दिवसाला नळाला पाणी पुरवठा होत आहे. आणखी दोन टँकर सुरु करण्याची मागणी नागरिकातून होऊ लागल्यावर ग्रामपंचायतने  टँकर मागणीचा प्रस्ताव पाठवून दिला. मात्र, प्रस्तावासोबत ज्या शेतकऱ्यांची कूपनलिका अगोदरच अधिग्रहित केली तीच पुन्हा टँकरसाठी दाखवल्याचे  उघडे पडले. पाहणी करण्यास आलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनाही याचा अचंबा वाटला. यामुळे दाखवलेली कूपनलिका त्यांनी नामंजूर केली.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या अशा खोटारडेपणाची गावात चांगलीच चर्चा आहे. पदाधिकाऱ्याच्या अशा खोटारडेपणामुळे ग्रामस्थांना आणखी काही दिवस टँकरपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
सध्या नवीन टँकर मागणीचा प्रस्ताव दिला असून पाणी स्त्रोत मिळत नसल्यामुळे टँकर मंजूरीस विलंब लागत आहे, लवकरच नवीन पाणी स्त्रोत उपलब्ध करुन देण्यासाठी स्त्रोत पाहण्यात येत आहे.
                                                     -दिलीप म्हेत्रे, सरपंच, पळसप


Tuesday, 29 January 2019

ग्रामसभेत पडला तक्रारींचा पाऊस


पळसपच्या ग्रामसभेत सरपंचांना धरले धारेवर
पळसप,ता.28(बातमीदार):- टंचाई परिस्थितीमुळे अधिग्रहन केले असतानाही महिन्यातून एकदाही नळाला पाणी का सोडले जात नाही, अधिग्रहित कुपनलिकेचे पाणी विक्री केले जात असताना पायबंद का घातला जात नाही, आदी प्रश्नाचा भडीमार करत ग्रामस्थांनी ग्रामसभेत अक्षरशा: तक्रारीचा पाऊस पाडला. ग्रामस्थांनी सरपंचांना चांगलेच धारेवर धरले.
          पळसप (ता.उस्मानाबाद) येथे रविवारी (ता.26) सरपंच दिलीप म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी उपसरपंच दिपक सरडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद लाकाळ, नेताजी फुटाणे, विलास सुरवसे, फुलचंद फुटाणे, कल्याण लाकाळ, ग्रामविकास अधिकारी श्री.करपे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी ग्रामविकास अधिकारी श्री. करपे यांनी ग्रामसभेतील विषयाचे वाचन करुन ग्रामसभेला सुरुवात केली. तेव्हा मागिल ग्रामसभेचे इतिवृत्त न वाचता ग्रामसभा सुरु केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
          गावात सध्या तीव्र पाणी टंचाईमुळे चार कुपनलिकांचे अधिग्रहन करण्यात आले असतानाही महिण्यातून नळाला केवळ एक वेळेस पाणी येते. त्यामुळे ग्रामस्थांना विकत घेतलेल्या पाण्यावर सध्या आपली तहान भागवण्याची वेळ आली आहे, अशी बाजू मांडत ग्रामस्थांनी अधिग्रहित कूपनलिकेचे पाणी विक्री करत असलयाची तक्रार केली. असे असतानाही ग्रामपंचायत या बाबीकडे दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्न विचारुन सरपंच म्हेत्रे यांना धारेवर धरले. अधिग्रहित कूपनलिकेपैकी एक कूपनलिका सरपंच म्हेत्रे यांच्या मालकीची  आहे. मात्र, ही  महिन्यापूर्वी बंद पडली असतानाही ग्रामपंचायतने वरिष्ठ कार्यालयाला वेळेत माहिती का दिली नाही, असे म्हणत ग्रामस्थांनी जाब विचारला.  स्वच्छताग्रहाचे बांधकाम करुन देखील अनुदान न मिळणे, आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसणे, शाळेला पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होणे आदी प्रश्नविचारुन ग्रामस्थांनी अक्षरशा: तक्रारींचा पाऊसच पाडला. कृषी सहाय्यक गावात फिरकत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक गैरसोईचा सामना करावा लागत असल्याने कृषी सहाय्यकाची बदली करण्याचा ठराव यावेळी ग्रामसभेत घेण्यात आला.
*****




Saturday, 15 December 2018

यंदा टोचणार “रेशीम” चे काटे




रेशीम उत्पादक अडचणीत, टँकरने पाणी विकत घेऊन तूती जगविण्याची कसरत 


पळसप,दि.14(बातमीदार):- जिल्ह्यात शेतकऱ्यांना सध्या भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सर्वत्र पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पळसप (ता.उस्मानाबाद) येथील रेशीम उत्पादक शेतकरी लागवडीवर मोठा खर्च करुन देखील अडचणीत आले आहेत. त्यांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे.  तुतीला जगविण्यासाठी चक्क टँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे. राजेंद्र माळी यांनी आतापर्यंत टँकरने पाणी देऊन तुती जगवण्याचा प्रयत्न केला आहे.
पळसप येथे ऊसाबरोबरच रेशीम उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने येथील जवळपास 18 शेतकऱ्यांनी 20 एकरवर रेशीम शेती उभी केली आहे. पारंपारिक शेतीला टाळून येथील काही शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. मात्र, या शेतकऱ्यांना आता दुष्काळी परिस्थितीचा फटका सहन करावा लागत आहे. यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने विहीरीने तळ गाठला आहे.  कूपनलिकाही  बंद पडल्या आहेत, त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा तुती जगवण्यासाठी पाणीच नसल्याने रेशीम उत्पादक शेतकरी  पार मेटाकुटीला आले आहेत.
 रेशीम शेती जगविण्यासाठी श्री. माळी यांनी जिद्दीने प्रयत्न करुन टँकरच्या सहाय्याने पाणी घालून रेशिम शेती हिरवी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यांना सातत्याने 700 रुपये देउन पाच हजार लिटरचे टँकर घ्यावे लागत आहे. असा खर्च करुनही त्यांना फायदा होण्याची शक्यता कमीच वाटत आहे. कारण सध्या रेशिम कोषाला भाव कमी मिळत असल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.
सध्या रेशीम कोषाला प्रतिकिलोला शंभर ते 250 रुपये प्रमाणे भाव मिळत आहे. याची कर्नाटकमध्ये नेउन विक्री करावा लागत आहे. त्यामुळे रेशीम कोष व्रिकीसाठी किलोमागे जवळपास 30 ते 40 रुपये शेतकऱ्यांना वाहतूक खर्च येत आहे. कर्नाटक राज्यात रेशीम कोषाला किलोमागे 50 रुपये प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. मात्र, किलोमागे 30 ते 40 रुपये वाहतूक खर्च येथील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असून कर्नाटकप्रमाणे राज्यात शासनाने किलोला किमान 100 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
गेल्या वर्षी रेशीम कोषाचा दर 475 ते 650 पर्यंत होता. मात्र, यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना देखील दर घसरले असल्याने शेतकरी मोठया अडचणीत आले आहेत. त्यातच दुष्काळामुळे पाण्याची समस्या निर्माण झाल्याने टँकरने पाणी द़यावे लागत असल्यामुळे अडचणीत अणखीनच भर पडली आहे. जमेल तेथून टँकरने विकत पाणी आणून झाडे जगविण्याचा आटापिटा करावा लागत आहे.

Tuesday, 30 October 2018

किटकनाशके, तणनाशके फवारताना काळजी घ्यावी


शेतात उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी विविध किटकनाशके, तणनाशके फवारत असतात ती फवारत असताना  शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. रासायनिक औषधे शेतकरी शेतात, झाडांवर फवारताना मुख्यत: तीन प्रकारे धेका निर्माण होवू शकतो. रासायनिक औषधांचे अत्यंत बारीक कण हवेबरोबर श्वासोच्छवासासोबत शरीरात जातात. फवारणी करीत असताना त्वचेच्या संपर्कामधून तथा डोळयांद्वारे शरीरात जातात. फवारणी करतांना नकळत तोंडाद्वारे खताना, बीडी पीताना शरीरात जाऊ शकतात.
किटकनाशके वापर करताना सर्वसाधारपणे घ्यावयाची काळजी :
 किटनाशकाच्या प्रत्येक वेष्टनासमवेत त्या किटकनाशकाचे लेबल व माहितीपत्रक अंतर्भूत असते, या लेबल व माहितीपत्रकामध्ये असेलेली माहिती नीट वाचावी व समजून घ्यावी. किटकनाशके मुळ पॅकिंगमध्ये खरेदी करावीत. किटनाशके ही विषारी असल्याने त्यांची हाताळणी करतांना सदैव जागरुक रहावे. किटकनाशके वापरण्याची साधनसामग्री जसे फवारणी पंप नेहमी व्यवस्थित चालू ठेवावेत. गळके फवारणी यंत्र न वापरता ते दुरुस्त करुन वापरावे. किटकनाशके फवारणी यंत्रात भरतांना सांडू नये यासाठी नरसाळ्याचा वापर करावा. तणनाशक फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप किटकनाशक फवारणीसाठी वापरु नये. किटकनाशक वापरताना संरक्षक कपडे घालावे.(उदा. गॉगल, पायात मोजे, तोंडाला मास्क, डोक्यावर कापड, गमबुट इ.)
फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवून ठेवावेत. झिजलेली, खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत. किटकनाशकाला हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे. फवारणीचे मिश्रण जेवढे लागणार आहे तेवढे एकदाच तयार करुन हाताने न ढवळता लांब लाकडी दांड्याचा किंवा काठीचा वापर करावा. किटकनाशक पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रण करतांना अथवा फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे. पाऊस येण्यापूर्वी किंवा पाऊस झाल्यानंतर तसेच तीव्र ऊन्हात फवारणी करु नये. फवारणीचे काम पूर्ण झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवून खाणे-पिणे करावे. फवारणीचे वेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासून दूर ठेवावे. उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपूर्वी न्याहारी करावी. फवारणी करताना वापरलेली भांडी, साहित्य नदी, नाला किंवा विहिरीजवळ धुवू नयेत.
धुतांना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीत टाकावेत अथवा मातीत गाडावे. किटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर नष्ट करुन टाकाव्यात. फवारणी करताना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुंकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढू नये त्यासाठी सोयीस्कर तार, काडी किंवा टाचणी वापरावी. किटकनाशके फवारण्याचे काम करताना वापरण्याचे कपडे स्वतंत्र ठेवावेत व वेळोवेळी स्वच्छ धुवून काढावेत. किटकनाशके अंगावर पडू नयेत म्हणून वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करुन तसेच उंच झाडावर फवारणी करताना औषध अंगावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. किटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरण्यासाठी किमान दोन आठवडे जावू देवू नये. जमिनीवर सांडलेले किटकनाशक हातांनी न पुसता त्यावर पाणी न टाकता ती माती/ चिखल यांच्या सहाय्याने शोषून घ्यावेत व जमिनीत गाडून टाकावीत. डब्यांवरील मार्गदर्शक चिन्हाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. त्यानुसार सुरुवातीस हिरवा रंग कमी विषारी, निळा रंग मध्यम विषारी त्यानंतर पिवळा रंग तीव्र विषारी व शेवटी लाल अती तीव्र विषारी चिन्ह, खून असलेली औषधे क्रमाने वापरावे.
विषबाधाची लक्षणे :- अशक्तपणा व चक्कर येणे, त्वचेची जळजळ होणे, डाग पडणे, घाम येणे, डोळ्यांची जळजळ होणे, पाणी येणे, अंधुक दिसणे, तोंडातून लाळ गाळणे, तोंडाची आग होणे, उलटी येणे, मळमळणे, हगवण होणे, पोटात दुखणे, डोकेदुखी, अस्वस्थ होणे, स्नायुदुखी, जीभ लुळी पडणे, बेशुद्ध होणे, धाप लागणे, छातीत दुखणे, खोकला येणे.
विषबाधेची शंका आल्यास खात्री करा:- रोग्याचा किटकनाशकांसह संपर्क आला होता काय? नेमके कोणते किटकनाशके वापरले? आंतरप्रवाही की स्पर्शजन्य? डॉक्टरांसाठी ही  माहिती  महत्त्वाची आहे. रोग्यास शक्य तितक्या लवकर  दवाखान्यात पोहचवा.
तरी शेतकऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
                                                          विलास फुटाणे उस्मानाबाद.



पळसप येथे इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल पेडियाट्रिक्स तर्फे वृक्षारोपण

धाराशिव:- इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल पेडियाट्रिक्स यांच्या वतीने पळसप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आल...