Saturday 15 December 2018

यंदा टोचणार “रेशीम” चे काटे




रेशीम उत्पादक अडचणीत, टँकरने पाणी विकत घेऊन तूती जगविण्याची कसरत 


पळसप,दि.14(बातमीदार):- जिल्ह्यात शेतकऱ्यांना सध्या भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सर्वत्र पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पळसप (ता.उस्मानाबाद) येथील रेशीम उत्पादक शेतकरी लागवडीवर मोठा खर्च करुन देखील अडचणीत आले आहेत. त्यांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे.  तुतीला जगविण्यासाठी चक्क टँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे. राजेंद्र माळी यांनी आतापर्यंत टँकरने पाणी देऊन तुती जगवण्याचा प्रयत्न केला आहे.
पळसप येथे ऊसाबरोबरच रेशीम उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने येथील जवळपास 18 शेतकऱ्यांनी 20 एकरवर रेशीम शेती उभी केली आहे. पारंपारिक शेतीला टाळून येथील काही शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. मात्र, या शेतकऱ्यांना आता दुष्काळी परिस्थितीचा फटका सहन करावा लागत आहे. यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने विहीरीने तळ गाठला आहे.  कूपनलिकाही  बंद पडल्या आहेत, त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा तुती जगवण्यासाठी पाणीच नसल्याने रेशीम उत्पादक शेतकरी  पार मेटाकुटीला आले आहेत.
 रेशीम शेती जगविण्यासाठी श्री. माळी यांनी जिद्दीने प्रयत्न करुन टँकरच्या सहाय्याने पाणी घालून रेशिम शेती हिरवी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यांना सातत्याने 700 रुपये देउन पाच हजार लिटरचे टँकर घ्यावे लागत आहे. असा खर्च करुनही त्यांना फायदा होण्याची शक्यता कमीच वाटत आहे. कारण सध्या रेशिम कोषाला भाव कमी मिळत असल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.
सध्या रेशीम कोषाला प्रतिकिलोला शंभर ते 250 रुपये प्रमाणे भाव मिळत आहे. याची कर्नाटकमध्ये नेउन विक्री करावा लागत आहे. त्यामुळे रेशीम कोष व्रिकीसाठी किलोमागे जवळपास 30 ते 40 रुपये शेतकऱ्यांना वाहतूक खर्च येत आहे. कर्नाटक राज्यात रेशीम कोषाला किलोमागे 50 रुपये प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. मात्र, किलोमागे 30 ते 40 रुपये वाहतूक खर्च येथील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असून कर्नाटकप्रमाणे राज्यात शासनाने किलोला किमान 100 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
गेल्या वर्षी रेशीम कोषाचा दर 475 ते 650 पर्यंत होता. मात्र, यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना देखील दर घसरले असल्याने शेतकरी मोठया अडचणीत आले आहेत. त्यातच दुष्काळामुळे पाण्याची समस्या निर्माण झाल्याने टँकरने पाणी द़यावे लागत असल्यामुळे अडचणीत अणखीनच भर पडली आहे. जमेल तेथून टँकरने विकत पाणी आणून झाडे जगविण्याचा आटापिटा करावा लागत आहे.

सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा… उमाकांत मिटकर

  उस्मानाबाद:-विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजातील उपेक्षित -वंचित घटकात जाऊन सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा,असे आवाहन सामाजिक का...