Monday 2 April 2018

उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका,सेविका व मदतनीस यांचा गौरव


                                                                     दि. 28 मार्च 2018
उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका,सेविका व मदतनीस यांचा गौरव

उस्मानाबाद.दि.28:-  जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त  उत्कृष्ट काम करणाऱ्या आदर्श 18 अंगणवाडी पर्यवेक्षिका, 65 अंगणवाडी सेविका व 67 मदतनीस यांचा प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद महिला सदस्यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
            जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महिला व बालकल्याण सभापती सौ. सखुबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, समाजकल्याण सभापती चंद्रकला नारायणकर, महिला व बालकल्याण समिती सदस्या सक्षणा सलगर, श्रीमती.मीनाताई तोडकर, सौ. ज्योती पत्रिके, उषाताई यरकळ, श्रीमती.जयश्री खंडागळे, श्रीमती.अस्मिता कांबळे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेव राजगुरु, श्री. उध्दव साळवी, श्रीमती.छायाताई कांबळे, सामाजिक कार्यकर्ते रमेश पवार, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी आर्यचाणक्य विद्यालयाच्या विद्यार्थींनी स्वागतगीत सादर केले.
            यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील म्हणाले की, देशाचे भवितव्य अंगणवाडी केंद्रातून घडत असल्याने अंगणवाडी केंद्र अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगितले.
            अंगणवाडी सेविका यांचे स्थान बालकांच्या जीवनात आईबरोबरचे आहे, 14 व्या वित्त आयोगातून सर्व अंगणवाडी केंद्रांना टीव्ही संच घेण्याचे आवाहन करुन अंगणवाडीतील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी सांगितले.
            जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांनी अंगणवाडी सेविकांनी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले.
                        महिला बालकल्याण सभापती श्रीमती.पवार यांनी जिल्ह्यातील कुपोषण निर्मुलनासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांनी केलेल्या कामाचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.
            उप मुख्य कार्यकारी अधिकारी(बाक)श्री.बी.एच.निपाणीकर यांनी निती आयोग निर्देशांक, लोकसहभागातून सुरु करण्यात आलेले 170 ग्राम बालविकास केंद्र, सन 2018-22 चे व्हिजन डाक्युमेंट, अंगणवाडी प्रवेशोत्सव अभियान आदींबाबतची माहिती प्रास्ताविकातून विषद केली.
            जिल्ह्यातील दहा प्रकल्पांतर्गत कार्यकरत असलेल्या अंगणवाडी सेविकांपैकी ज्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी उत्कृष्ट काम केले आहे त्यांचा प्रकल्पनिहाय सत्कार करण्यात आला. आयएसओ मानाकंन प्राप्त झालेल्या अंगणवाडी केंद्रांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस मोठया प्रमाणात उपस्थित होत्या.              

No comments:

Post a Comment

सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा… उमाकांत मिटकर

  उस्मानाबाद:-विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजातील उपेक्षित -वंचित घटकात जाऊन सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा,असे आवाहन सामाजिक का...