Tuesday 29 January 2019

ग्रामसभेत पडला तक्रारींचा पाऊस


पळसपच्या ग्रामसभेत सरपंचांना धरले धारेवर
पळसप,ता.28(बातमीदार):- टंचाई परिस्थितीमुळे अधिग्रहन केले असतानाही महिन्यातून एकदाही नळाला पाणी का सोडले जात नाही, अधिग्रहित कुपनलिकेचे पाणी विक्री केले जात असताना पायबंद का घातला जात नाही, आदी प्रश्नाचा भडीमार करत ग्रामस्थांनी ग्रामसभेत अक्षरशा: तक्रारीचा पाऊस पाडला. ग्रामस्थांनी सरपंचांना चांगलेच धारेवर धरले.
          पळसप (ता.उस्मानाबाद) येथे रविवारी (ता.26) सरपंच दिलीप म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी उपसरपंच दिपक सरडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद लाकाळ, नेताजी फुटाणे, विलास सुरवसे, फुलचंद फुटाणे, कल्याण लाकाळ, ग्रामविकास अधिकारी श्री.करपे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी ग्रामविकास अधिकारी श्री. करपे यांनी ग्रामसभेतील विषयाचे वाचन करुन ग्रामसभेला सुरुवात केली. तेव्हा मागिल ग्रामसभेचे इतिवृत्त न वाचता ग्रामसभा सुरु केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
          गावात सध्या तीव्र पाणी टंचाईमुळे चार कुपनलिकांचे अधिग्रहन करण्यात आले असतानाही महिण्यातून नळाला केवळ एक वेळेस पाणी येते. त्यामुळे ग्रामस्थांना विकत घेतलेल्या पाण्यावर सध्या आपली तहान भागवण्याची वेळ आली आहे, अशी बाजू मांडत ग्रामस्थांनी अधिग्रहित कूपनलिकेचे पाणी विक्री करत असलयाची तक्रार केली. असे असतानाही ग्रामपंचायत या बाबीकडे दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्न विचारुन सरपंच म्हेत्रे यांना धारेवर धरले. अधिग्रहित कूपनलिकेपैकी एक कूपनलिका सरपंच म्हेत्रे यांच्या मालकीची  आहे. मात्र, ही  महिन्यापूर्वी बंद पडली असतानाही ग्रामपंचायतने वरिष्ठ कार्यालयाला वेळेत माहिती का दिली नाही, असे म्हणत ग्रामस्थांनी जाब विचारला.  स्वच्छताग्रहाचे बांधकाम करुन देखील अनुदान न मिळणे, आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसणे, शाळेला पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होणे आदी प्रश्नविचारुन ग्रामस्थांनी अक्षरशा: तक्रारींचा पाऊसच पाडला. कृषी सहाय्यक गावात फिरकत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक गैरसोईचा सामना करावा लागत असल्याने कृषी सहाय्यकाची बदली करण्याचा ठराव यावेळी ग्रामसभेत घेण्यात आला.
*****




No comments:

Post a Comment

सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा… उमाकांत मिटकर

  उस्मानाबाद:-विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजातील उपेक्षित -वंचित घटकात जाऊन सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा,असे आवाहन सामाजिक का...